Tuesday, August 4, 2026

नाती कशी अशी ही...


 नाती कशी अशी ही...


नाती कशी अशी ही, विस्कळीत झाली l
जी हृदयानजीक होती, ती फार दूर गेली llधृll

​गेले किती उन्हाळे, पावसाळे किती गेले l
नाती जळून गेली, नाती धुवून गेली ll१ll

​भेट झाली जरी समोरी, मने फार दूर गेलीl
जरी भेटलो समोरी, ओळखीची खूण गेली ll२ll

​येता येता शब्द ओठी, वाणी अबोल झाली l
मनातील भावनांची, इथे धुळधाण झाली ll३ll

​शोधतो मी आजही, ती माणसे हरवलेली l
अश्रूंच्या या पुरामध्ये, माणसे वाहून गेली ll४ll

​गैरसमजाची भिंत, नको तितकी वाढली l
आपुलकीची ती वाट, अंधारात हरवली ll५ll

​आरोपांच्या धुरळ्यात, माया ती विरून गेली l
आपुलकीची ती जागा, आता रिकामीच उरली ll६ll

कवी:- श्री. संभाजी रुक्मिणी कृष्णा घाडी,
वेताळ बांबर्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग




Wednesday, June 10, 2026

​पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी?

 ​पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी?


​कान्हाला राधा हल्ली, भेटलीच नाही,

पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी?


​यमुनेचा तीर आता, सुना सुना भासे,

राधेविना कान्हाला, सूर ना गवसे,

पावा ठेवी ओठांवर, राधेचाच सूर धरी,

पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी?


​कान्हाला कोणतेच काम, आता का सुचेना?

राधेविना कान्हाला, गोड काही लागेना,

कान्हाचा हा जीव आता, कासावीस होई,

पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी?


​कुंजवनी वाहे आता, शांत गार वारा,

शांत झाला कान्हा, झाली शांत रासक्रीडा,

पैंजणांचा नाद नाही, कान्हा व्याकुळ होई,

पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी?


​कान्हा व्याकुळ तर, वृंदावन व्याकुळ,

वृक्षवल्ली व्याकुळ आणि लताही व्याकुळ,

अधीर होऊन मन, कान्हा मनी खिन्न होई,

पुसे कान्हा राधिकेला, भेटशील कधी?


कवी: श्री. संभाजी कृष्णा घाडी

वेताळ बांबर्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग





Friday, June 5, 2026

तू फक्त सोबत राहावं

 

🌸 तू फक्त सोबत राहावं 🌸

फुले माझी तुझ्यासाठी,
तुझ्याच वेणीत सजवावी.
फुलासारखी तू नेहमी,
माझ्या अंतरंगी दरवळावी.

ऋतू कोणताही असो,
तुझी प्रीत बहरत रहावी.
प्रत्येक जन्मी हीच फुले,
मी तुझ्या केसांत माळावी.

तुझ्या असण्याने कळ्यांना,
एक नवी बहार यावी.
नसावा मोह गंधाचा मला,
श्वासात तुझी प्रीत असावी.

तू फक्त सोबत राहावं,
आपली हीच दुनिया व्हावी.
तुझी माझी सुंदर गोष्ट,
फुलांनी अजरामर करावी.

✍️ संभाजी कृष्णा घाडी
📍 वेताळ बांबर्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग
🌺 प्रेमाला शब्दांची गरज नसते,
सोबतच त्याचा सर्वात सुंदर अर्थ असतो... 🌺

Friday, November 28, 2025

🪶टक्कल आहे फॅशन आज!

 



🪶टक्कल आहे फॅशन आज!


टक्कल माझं पडणारं पाहून,
मला जरा टेन्शन येतं,
पण दुसऱ्याचं उडलेलं छप्पर पाहून,
माझंच मन धीर देतं.

संपली आता पन्नाशी,
गाडी निघाली साठीकडे.
कसली काळजी करता तुम्ही,
कोण पाहणार तुमच्याकडे?

जरा बाजारात फिरून बघा,
म्हणतात काका तुम्हा सगळे.
आजोबा म्हणायची वेळ आली,
तरी करता केस काळे?

दुसऱ्याकडे बघा जरा,
ऐन तारुण्यात छप्पर उडालं.
लग्न करायच्या वेळेला,
नकली छप्पर कामी आलं.

टक्कल ही समस्या नाही,
खर तर ती श्रीमंती आहे.
खर्च कमी करायची,
ती तर नामी युक्ती आहे.

शाम्पू नको, फणी नको,
केस विंचरायला वेळ नको.
तेल कमी लागतं म्हणे,
केस रंगवायला मेहंदी नको.

टक्कल म्हणजे नाही संकट,
ती तर आहे फॅशन आज!
टकलू कोणी म्हटले तरी,
फक्त हसून द्यावी दाद!

✍️

श्री. संभाजी घाडी
वेताळ बांबर्डे, तालुका: कुडाळ
सिंधुदुर्ग


🪶 आई, जीवनाचा अर्थ आहे!

 

🪶 आई, जीवनाचा अर्थ आहे! 


घरी रोजच जातो आपण,
तो तर नित्य प्रवास आहे. 
वाट पाहणार असेल कोणी,
तर घरी जाण्यात अर्थ आहे.
 
जेवण जेवतो रोजच आपण,
शरीराची ती गरज आहे.
प्रेमाने कोणी वाढलं जेवण,
तर जेवणात आनंद आहे.

​बायको, मुलं, भाऊ, बहीण,
नात्यांचा ‘रेशमी बंध' आहे.
आईसारखं जीव लावणं
सांगा कुणाला जमणार आहे?

​कामा वरून थकून येणं,
हे तर आता रोजचं आहे.
थकलेला चेहरा वाचणार,
आई शिवाय कोण आहे?.

​वाट पाहणारी आईच असते,
तिचं काळीज वेगळं आहे.
बाकी आपलं काळजी वाहू,
घरी एक सरकार आहे.​

जीवनातील प्रत्येक क्षण,
आईवाचून व्यर्थ आहे.
आईमुळेच तर आपल्या, 
जीवनाला आज अर्थ आहे.

---------
                    ✍️ कवी: श्री. संभाजी घाडी
                                 वेताळ बांबर्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग







Tuesday, July 29, 2025

मनी आस अजूनी आहे

मनी आस अजूनी आहे

सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे.
तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे.

तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे.
तुझ्या विरहात माझा, जीव व्याकुळ होत आहे.
कधी भेटशील सांग ना तू, तुझी वाट मी पाहत आहे.
तू भेटशील मला, मनी आस अजूनी आहे.

किती पहिली स्वप्न आपुली, तुझी आठवण  नित्य वाहिली.
चित्त माझे नित्य तुझ्या, अवती भवती घिरट्या घाली.
तुझ्यावर माझा सखे, अजुनी दृढ विश्वास आहे.
 केव्हातरी येशील तू, मनी आस अजूनी आहे.

गेलीस जरी तू कधी समोरून माझ्या,
मला भेटण्याची तव मनी नसे इच्छा.
खंत हीच मनी मम नित्य जाळीत आहे,
तरी भेटशील मला, मनी आस अजूनी आहे,

मला भेटण्याची ओढ, मनी जरी नसली तुझ्या.
पूर्ण करशील का तू? माझ्या मनीची एक इच्छा, 
सांग सखे लटकेच मला, आजूनही मी तुझीच आहे.
येशील तू भेटण्या मला, मनी आस अजूनी आहे.

 श्री. संभाजी कृष्णा घाडी
 वेताळ बांबर्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग









Saturday, July 5, 2025

नित्य सतावीन तुला




नित्य सतावीन तुला

होतील यातना मला, 
सोडूनी जाईन जेव्हा तुला.
कशी विसरशील मला, 
स्वप्नी नित्य सतावीन तुला.

जरी सोडूनी गेलो तुज मी,
विसरू नाही शकत तुला मी.
कशी विसरशील सांग मला तू?
कशी टाकशील मनातून तू?

आठव तू ते क्षण दोघांचे,
जरी न पटले तुझे नी माझे.
किती भेटलो किती भांडलो,
तुझ्या वाचूनी नाही रमलो.

कसा विसरू सांग तुला मी?
मनातून तू कधी न गेली.
आठवणींची वादळ आली,
आसवांनी सृष्टी भिजली.

हृदय माझे तुजला दिधले,
चित्त माझे तुझं अर्पियले.
उरलो आहे आज भिकारी,
तुझ्या विना मी मृत प्रवासी.

तरी तुझी ही आज्ञा मानून,
आज तुला मी सोडून जाईन.
आठवणींच्या हिंदोळ्यावर, 
नित्य तुला मी भेटत राहीन.

कवी: संभाजी कृष्णा घाडी
      वेताळ बांबर्डे.

नाती कशी अशी ही...

  नाती कशी अशी ही... ​ नाती कशी अशी ही, विस्कळीत झाली l जी हृदयानजीक होती, ती फार दूर गेली llधृll ​गेले किती उन्हाळे, पावसाळे किती गेले l ना...