🪶टक्कल आहे फॅशन आज!
मला जरा टेन्शन येतं,
पण दुसऱ्याचं उडलेलं छप्पर पाहून,
माझंच मन धीर देतं.
संपली आता पन्नाशी,
गाडी निघाली साठीकडे.
कसली काळजी करता तुम्ही,
कोण पाहणार तुमच्याकडे?
जरा बाजारात फिरून बघा,
म्हणतात काका तुम्हा सगळे.
आजोबा म्हणायची वेळ आली,
तरी करता केस काळे?
दुसऱ्याकडे बघा जरा,
ऐन तारुण्यात छप्पर उडालं.
लग्न करायच्या वेळेला,
नकली छप्पर कामी आलं.
टक्कल ही समस्या नाही,
खर तर ती श्रीमंती आहे.
खर्च कमी करायची,
ती तर नामी युक्ती आहे.
शाम्पू नको, फणी नको,
केस विंचरायला वेळ नको.
तेल कमी लागतं म्हणे,
केस रंगवायला मेहंदी नको.
टक्कल म्हणजे नाही संकट,
ती तर आहे फॅशन आज!
टकलू कोणी म्हटले तरी,
फक्त हसून द्यावी दाद!

