Tuesday, July 29, 2025

मनी आस अजूनी आहे

मनी आस अजूनी आहे

सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे.
तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे.

तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे.
तुझ्या विरहात माझा, जीव व्याकुळ होत आहे.
कधी भेटशील सांग ना तू, तुझी वाट मी पाहत आहे.
तू भेटशील मला, मनी आस अजूनी आहे.

किती पहिली स्वप्न आपुली, तुझी आठवण  नित्य वाहिली.
चित्त माझे नित्य तुझ्या, अवती भवती घिरट्या घाली.
तुझ्यावर माझा सखे, अजुनी दृढ विश्वास आहे.
 केव्हातरी येशील तू, मनी आस अजूनी आहे.

गेलीस जरी तू कधी समोरून माझ्या,
मला भेटण्याची तव मनी नसे इच्छा.
खंत हीच मनी मम नित्य जाळीत आहे,
तरी भेटशील मला, मनी आस अजूनी आहे,

मला भेटण्याची ओढ, मनी जरी नसली तुझ्या.
पूर्ण करशील का तू? माझ्या मनीची एक इच्छा, 
सांग सखे लटकेच मला, आजूनही मी तुझीच आहे.
येशील तू भेटण्या मला, मनी आस अजूनी आहे.

 श्री. संभाजी कृष्णा घाडी
 वेताळ बांबर्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग









Saturday, July 5, 2025

नित्य सतावीन तुला




नित्य सतावीन तुला

होतील यातना मला, 
सोडूनी जाईन जेव्हा तुला.
कशी विसरशील मला, 
स्वप्नी नित्य सतावीन तुला.

जरी सोडूनी गेलो तुज मी,
विसरू नाही शकत तुला मी.
कशी विसरशील सांग मला तू?
कशी टाकशील मनातून तू?

आठव तू ते क्षण दोघांचे,
जरी न पटले तुझे नी माझे.
किती भेटलो किती भांडलो,
तुझ्या वाचूनी नाही रमलो.

कसा विसरू सांग तुला मी?
मनातून तू कधी न गेली.
आठवणींची वादळ आली,
आसवांनी सृष्टी भिजली.

हृदय माझे तुजला दिधले,
चित्त माझे तुझं अर्पियले.
उरलो आहे आज भिकारी,
तुझ्या विना मी मृत प्रवासी.

तरी तुझी ही आज्ञा मानून,
आज तुला मी सोडून जाईन.
आठवणींच्या हिंदोळ्यावर, 
नित्य तुला मी भेटत राहीन.

कवी: संभाजी कृष्णा घाडी
      वेताळ बांबर्डे.

"जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी"

 "जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी"


तूच भवानी तू सरस्वती, शक्ती तू या जगताची.

तूच अंबिका तूच लक्ष्मी, पार्वती
गौरीहराची.


तू कौशल्या दशरथाची, माता श्री प्रभुरामाची.

तूच देवकी तूच यशोदा, मैय्या नंदकिशोराची.


सत्यभामा तू  तूच रुक्मिणी, भार्या तू श्रीकृष्णाची.

 तूच गोपिका तूच प्रेमिका, राधा तू घनश्यामाची.


तूच घडविले शिवरायांना, आई जिजाऊ होऊनि.

ताराराणी लक्ष्मीबाई, तूच लढली रणांगणीही. 


तू मुक्ताई तूच जनाई, तूच भार्या तुकोबांची.

वेणाबाई आक्काबाई, मीराबाई तू बहिणाबाई.


अनेक रूपे तुझीच माते, त्रिभुवनी तू वास करी.

शक्तीपीठेही तुझीच माते, शक्तीरूपे तू जळी स्थळी.


तूच भगिनी तूच भार्या, तूच माता तूच जननी

जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी.

*******************************

श्री. संभाजी रुक्मिणी कृष्णा घाडी

वेताळ बांबर्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग


Tuesday, March 4, 2025

दातृत्व तुमचे आम्हास भावे

 【ही कविता म्हणजे शाळेस देणगी देणाऱ्या देणगी दारांचे स्वागत करण्यासाठी तयार केलेले स्वागत गीत】


 *_*दातृत्व तुमचे आम्हास भावे*_* 


या शाळेचे ऋण जाणोनि

चरण आपले वळले इथवर

बालपणीचे दिन आठवता

स्वर्ग ठेंगा होई सत्वर


तुम्हा आठवतील बाल सवंगडी

आणिक गुरुजन प्रिय तुम्हांसी

विद्यार्जन हे निमित्त होते

खेळत होते मित्र मैत्रिणी


तीच आठवण मनात येता 

शुभ संकल्प केला तुम्ही

पाया घडला ज्या विद्यालयी

देणे द्यावे विद्येचरणी


मंगल समयी दिन तो आला

दातृत्वाचा हात पुढे केला

दातृत्व तुमचे आम्हास भावे

ज्या कारणे पुण्य ते घडे


श्री. संभाजी घाडी

वेताळ बांबर्डे, कुडाळ 

सिंधुदुर्ग

Tuesday, January 14, 2025

भजन मी गातो




भजन मी गातो

मंदिरात तुझ्या देवा,
भजन मी गातो l
मन शुद्ध करूनी, फुले मी वहातो llधृll

सुंदर तूझे रूप देवा,
आवडे मला हे l
चित्ती मी इच्छीत राही, रूप तूझे गावे ll
मज ठावे देवा तूला,
भजनात नाही गोडी l
परी माझी श्रद्धा आंधळी, भजन मी गातो ll1ll

कळे मज हे देवा,
परी ना अंगी वळे l
तुझ्या भजनाने देवा, सुख मला मिळे ll
स्वार्थ माझा हाची देवा,
चित्त शुद्ध व्हावे l
म्हणूनी देवा आज तूझे, भजन मी गातो ll2ll

वळतो मी इथूनी देवा,
ध्येय माझे साकारण्या l
पाठविले तू ज्या कारणा, तेची साध्य करण्या ll
द्यावा आशिर्वाद देवा,
जिद्ध माझी राखण्या l
स्वप्न तुझे फुलविण्या, वचन मी देतो ll3ll

*****   संभाजी  कृष्णा  घाडी
*****   वेताळ बांबर्डे

मनी आस अजूनी आहे

मनी आस अजूनी आहे सांग भेटशील कधी तू , वाट तुझी मी पाहत आहे . तुला भेटण्याची माझ्या, मनी आस अजूनी आहे. तुझी आठवण मजला नित्य सतावीत आहे. तुझ्य...