"जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी"
तूच भवानी तू सरस्वती, शक्ती तू या जगताची.
तूच अंबिका तूच लक्ष्मी, पार्वती गौरीहराची.
तू कौशल्या दशरथाची, माता श्री प्रभुरामाची.
तूच देवकी तूच यशोदा, मैय्या नंदकिशोराची.
सत्यभामा तू तूच रुक्मिणी, भार्या तू श्रीकृष्णाची.
तूच गोपिका तूच प्रेमिका, राधा तू घनश्यामाची.
तूच घडविले शिवरायांना, आई जिजाऊ होऊनि.
ताराराणी लक्ष्मीबाई, तूच लढली रणांगणीही.
तू मुक्ताई तूच जनाई, तूच भार्या तुकोबांची.
वेणाबाई आक्काबाई, मीराबाई तू बहिणाबाई.
अनेक रूपे तुझीच माते, त्रिभुवनी तू वास करी.
शक्तीपीठेही तुझीच माते, शक्तीरूपे तू जळी स्थळी.
तूच भगिनी तूच भार्या, तूच माता तूच जननी
जय तू नारी भाग्यविधाती, तुझीच कीर्ती न्यारी.
*******************************
श्री. संभाजी रुक्मिणी कृष्णा घाडी
वेताळ बांबर्डे, कुडाळ, सिंधुदुर्ग